सांगली : ऊसतोडीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक, दहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

सांगली : ऊसतोडणीसाठी मजूर पुरविण्याचे आश्वासन देऊन कवठेपिरान येथील शेतकऱ्यांकडून ६ लाख ३२ हजार ५०० रुपये उकळणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील दहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अनिकेत श्रीबाळ वडगावे (रा. जुना सरकारी दवाखान्याच्या मागे, कवठेपिरान, ता. मिरज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित रवींद्र गिरधर भिल (३५), साजन संजय भिल (२७), अनिल रमेश भिल (३०), नीलेश संजय भिल (२५), लक्ष्मण सुकलाल भिल (४१), अर्जुन रामकृष्ण भिल (२२), दिनेश नाना भिल (२५), अनिल सुरेश भिल (३०), नितीन संजय भिल (३२) आणि दीपक ज्ञानेश्वर भिल (३० सर्व रा. दहीवद, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी अनिकेत वडगावे यांची कवठेपिरान येथे शेती आहे. सन २०२५-२६ सालाकरिता त्यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याशी ऊसतोडणी आणि वाहतूक करार केला होता. तसेच सर्व संशयितांसमवेत २५ जून २०२५ रोजी अमळनेर येथील ॲड. जयेश रमाकांत पाटील (रा. कलागुरूनगर, अमळनेर) यांच्या कार्यालयात ऊसतोडणी करारनामा केला. त्यावेळी ठरल्याप्रमाणे प्रत्येक कोयत्याला (एक जोडी) ५५ हजारप्रमाणे त्यांना वेळोवेळी रोख रक्कम तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून ६ लाख ३२ हजार ५०० रुपये दिले. परंतु, संशयितांनी ऊसतोडणीकरिता मजूर पाठविले नाहीत. तसेच फिर्यादी अनिकेत वडगावे यांच्याकडून घेतलेली रक्कमदेखील त्यांना परत दिली नाही. त्यामुळे अनिकेत यांनी फसवणुकीची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here