सांगली : सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) तर्फे गळीत हंगाम २०२४-२५ साठीचा राज्यस्तरीय सर्वोकृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली.१ लाख रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कदम म्हणाले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे मूल्यांकन केले जाते. त्याआधारे पुरस्कार दिले जातात. तसेच विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विविध पुरस्कार दिले जातात.
कारखान्याचे उस उत्पादक शेतकरी श्री. विनायक आनंदराव साळुंखे (रा. खेराडे विटा, ता. कडेगाव) यांना दक्षिण विभागात खोडवा हंगामात पहिला क्रमांक जाहीर झाला आहे. कारखान्याचे दुसरे ऊस उत्पादक शेतकरी अनिल बांबवडे ता. पलूस) यांना राज्यस्तरीय कै. वसंतराव नाईक सुरू हंगामातील राज्यात पहिला उसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १ लाख रुपये असे आहे. कारखान्याने नेहमीच सभासद, शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर आजपर्यंत दाखवलेल्या विश्वास व उत्तम नियोजन यामुळे कारखान्यास राष्ट्रीय व राज्यस्तरीय तसेच इतर संस्था यांच्याकडून एकूण २७ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम आदी उपस्थित होते.

















