सांगली : सांगली जिल्ह्यात उसावर ‘चाबूक काणी’ या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काणीचा प्रादुर्भाव ऊस पीक वाढीच्या अवस्थेतच दिसून येतो. लागणीपेक्षा खोडवा पिकामध्ये प्रादुर्भाव जास्त होतो. या रोगात उसाच्या शेंड्यामधून पातळ आवरण असलेला व चाबकासारखा दिसणारा काळा पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यात रोगाची काळी पावडर दिसून येते. ही काळी पावडर म्हणजे रोगाचे बिजाणू आहेत. या रोगामुळे ऊस उत्पादन व साखर उतारा यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. चाबूक काणी रोग मागील काही वर्षांत दिसत नव्हता. परंतु गेल्यावर्षीपासून या रोगाचा नव्याने शिरकाव झाला आहे. आता हा रोग दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
याविषयी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अलीकडील काही दिवसांत ‘एमएस १०००१’ या ऊस वाणावर हा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. पूर्वी हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसत होता. मात्र, मध्यंतरी तो गायब झाला होता. “उसावर अनेक प्रकारचे रोग येतात. यात गवताळ वाढ, तपकिरी ठिपके, तांबेरा अशा रोगांचा समावेश होतो. आता काणीचा प्रादुर्भाव आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ‘ॲमिस्टार टॉप’ ३० मिलि वा टिल्ट १०० मिलि वा विटा वॅक्स २०० ग्रॅम प्रति १०० लिटर मिसळून बेणे ३० मिनिटे बुडवून लागण करणे हा सुरुवातीचा उपाय आहे. आता रोगग्रस्त उसाची बेटे मुळासह काढून जाळून नष्ट करणे गरजेचे आहे. कमी प्रादुर्भाव असेल, तर ‘ॲमिस्टार टॉप’ १०० मिलि वा टिल्ट १०० मिलि, १०० लिटर पाण्यातून फवारा. अन्यथा ५ टक्क्यांपेक्षा जास्त रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर पीक काढून टाका असा सल्ला दिला आहे.















