सांगली : यंदा सातत्याने पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने शेतात साठलेले पाणी, ढगाळ हवामान, आर्द्रता, साचलेले पाणी यामुळे ऊस पिकावर बुरशीजन्य रोग, लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बहुतांश उसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. ८६०३२ या जातीवर लोकरी मावा, २६५ या जातीच्या उसावर पानावरील तपकिरी ठिपके तर ९२००५ व १०००१ या जातीच्या उसावर तांबेरा दिसून येत आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी चालू वर्षी केलेल्या ऊस लागवडीवरसुद्धा याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून ऊस पिकांची वाढ खुंटली आहे. रोगाचा प्रादुर्भाव व वाढ खुंटल्याने ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. वाळवा तालुक्याच्या दोन्ही दिशेने कृष्णा, वारणा या दोन्ही नद्या बारमाही वाहत आहेत. शिवाय उर्वरित क्षेत्रासाठी वारणेच्या डावा कालव्यातून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस पिक वाढले आहे. या सर्व क्षेत्रात अनेक ठिकाणी वातावरणातील बदल, ढगाळ हवामान, आर्द्रता, शेतात साचलेले पाणी यामुळे बुरशीजन्य रोग, लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांनी केले आहे.