सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाला दर द्यायला जमते. मग, सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना का जमत नाही? सांगली जिल्ह्यात उसाचा उतारा लागत नाही का, असा प्रश्न ‘स्वाभिमानी’कडून उपस्थित केला जातो आहे. कारखान्यांनी दर जाहीर केला नाही तर शेतकरी व वाहतूकदारांनीही तोडी घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीप्रमाणे बुधवारपर्यंत (ता. १२) कोल्हापूरप्रमाणे उसाला पहिली उचल विनाकपात ज्यांची एफआरपी ३४०० रुपयांच्या आत आहे. त्यांनी ३५०० व ज्यांचा एफआरपी दर ३४०० च्या वर आहे, त्यांनी एफआरपी अधिक १०० रुपये याप्रमाणे देण्याची वाट पाहत आहोत, असेही संघटनेने म्हटले आहे.
संदीप राजोबा म्हणाले, साखर कारखानदारांनी बुधवारची वाट न पाहता दर जाहीर करावेत, अन्यथा गुरुवारपासून संघटना आक्रमक होणार आहे. या आंदोलनाची सुरुवात क्रांतिवीर जी. डी. बापू लाड, दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन केली जाईल. कारखानदारांना सुबुद्धी दे, असे साकडे घातले जाईल. सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनीसुद्धा एफआरपीवरती एक रुपया देता येणे शक्य नाही, असे सांगितले होते. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यावहारिक भूमिका घेऊन दोन पावले मागे आले आणि त्याचवेळी साखर कारखानदारसुद्धा दोन पावलं पुढे आले. त्यांनी तत्काळ एफआरपीपेक्षा अधिक १०० ते १२५ रुपये जादा दर जाहीर केला आहे. पैसे देता येतात, हे यावरून सिद्ध झाले आहे.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना विनंती आहे, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला श्रेय द्यायचं नसेल तर राहू दे, परंतु शेतकऱ्याचे हित लक्षात ठेवून कोल्हापूरप्रमाणे १२ तारखेच्या आत उसाचा दर जाहीर करावा. जिल्ह्यातील कारखानदारांनी दर जाहीर केला नाही, तर संघटना शेतकऱ्यांना आवाहन करते की उद्यापासून (ता. ११) उसाच्या तोडी कोणी घेऊ नका. बुधवारनंतर एकही उसाचे कांडे रस्त्यावरून जाऊ दिले जाणार नाही. सर्व साखर कारखानदारांनी तत्काळ उसाचा दर जाहीर करावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे.












