सांगली : महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये उसाचे उत्पादन अधिक घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण ऊस पिकावरच अवलंबून आहे. त्यातही सांगली जिल्हा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांतील ट्रेंड पाहता बहुतांश साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. मात्र, जिह्यातील ऊस उत्पादन स्थिर आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत उसाचे क्षेत्र थोडे वाढले असले, तरीही अतिपावसाने उत्पादन घटले आहे. यावर्षी आलेल्या पुराने हजारो एकर क्षेत्रातील ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. अद्यापही काही ठिकाणी शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे ऊस टंचाईची शक्यता आहे. कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागातील कारखाने अधिकाधिक ऊस गाळपासाठी प्रयत्नशील असतात. तर सीमाभागातील कारखाने हे लवकर सुरू करून अधिकाधिक उसाचे गाळप करतात. सीमाभागात बहुतांश कारखान्यांचा गळीत हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविण्याकरिता कसरत करावी लागणार आहे. उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात राजारामबापू, सर्वोदय, जत, क्रांती, विश्वास, सोनहिरा, उदगिरी शुगर, मोहनराव शिंदे, श्री श्री रविशंकर, एन. डी. शुगर, श्रीपती शुगर, भारती शुगर, हुतात्मा हे कारखाने ऊस गाळप करतील. शिवाय जिल्ह्यालगतच्या वारणा, कृष्णा या कारखान्यांचा भरही येथील उसावर असेल.