सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या हंगामात सोनहिरा साखर कारकान्याने ३२८० रुपये, राजारामबापू कारखान्याने ३१६१ रुपये तर हुतात्मा कारखान्याने ३३०८ रुपये प्रति टन अंतिम दर दिला. आहे. हे तुलनेने जास्तीचे दर देणारे कारखाने आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा सांगलीपेक्षा एक ते दोन टक्के अधिक असल्याने त्यांचे दर दीडशे ते तीनशे रुपये अधिक राहतात. या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या हंगामात आधीच्या दराच्या तुलनेत दोनशे रुपयांची वाढ शक्य असल्याचा सूर व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत, गेल्या वर्षभरात साखरेचे दर सरासरी ३८०० रुपये क्विंटल राहिले आहेत. शेतकरी संघटनांनी ३६०० ते चार हजार रुपये दराची मागणी केली आहे. मात्र, दर ३३०० रुपयांपर्यंत मिळू शकतात अशी चिन्हे आहेत. यावर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखानदारांनी दराचे संकेत दिले आहेत.
सोनहिरा कारखान्याचे विश्वजित कदम यांनी १३ लाख टन गाळप झाले तर ३३०० रुपयांपर्यंत दर दिला जाऊ शकतो असे म्हटले आहे. बिद्री-कोल्हापूर कारखान्याचे के. पी. पाटील यांनी ३४५० रुपये दराची शक्यता वर्तवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ३७०० रुपये दराची मागणी केली आहे. तर ‘आंदोलन अंकुश ने ४ हजार रुपये मागणी केली आहे. गेल्या पाच वर्षांत ऊस प्रतिटन दरवर्षी दीडशे रुपये इतकी होत आली आहे. साखरेची एमएसपी मात्र स्थिर प्रतिक्विंटल ३१०० रुपयेच ठेवली आहे. सरासरी विक्री दर ३८०० रुपये गेला असतानाही किमान विक्री मूल्य मात्र वाढवले नाही. त्यामुळे आगामी आठ दिवसांत राज्य बँकेचे साखरेवर उचल द्यायचे धोरण जाहीर झाल्यानंतर जिल्हा बँकांची भूमिका स्पष्ट होईल. सरकारने एमएसपी आणि निर्यात साठा दोन्हीत वाढ केली पाहिजे असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक यांनी सांगितले. तर केंद्र शासनाने साखर निर्यातीसाठी तातडीने साठा वाढवून दिला पाहिजे, असे मत निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.


