सांगली : यंदा केळी, आले पिकाला अपेक्षित दर नाही. त्यामुळे जिल्ह्यातील केळी आणि आले पीक उत्पादक शेतकरी ऊस लागवडीकडे वळले असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात पूर्व आणि सुरू हंगामातील उसाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज साखर कारखानदांनी व्यक्त केला आहे. रोप लागणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर ६३ हजार ७४ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. यंदाच्या हंगामात आडसाली उसाची ३५ हजार ९९७ हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्यावर्षी आडसाली हंगामात ४४ हजार ९१७ हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. तर २०२४-२५ मध्ये ४७ हजार ६३ हेक्टर आडसाली हंगामातील उसाचे क्षेत्र होते. आता सुरू हंगामातील लागवडीस गती आली आहे.
पावसाने नोव्हेंबरनंतर उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्व हंगामातील ऊस लागवड करण्यासाठी नियोजन केले. या कालावधीत लागवडीला गती आली. पूर्व हंगामात २० हजार ६९७ हेक्टरवर लागवड झाली. वास्तविक, दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांत प्रामुख्याने पूर्व आणि सुरू हंगामातील उसाची लागवड करतात. त्यांच्याकडील सुरू हंगामातील ऊस लागवड सुरू झाली असून लागवडीस गती आली आहे. सुरू हंगामात ७१० हेक्टरवर लागवड झाली. गेल्यावर्षी अती पावसामुळे आडसाली हंगामातील उसाचे क्षेत्र कमी झाले होते. यंदा ऑक्टोबरअखेर पाऊस होता. त्याचा परिणाम आडसाली हंगामातील लागवडीवर झाला. सलग दोन वर्षे पावसाचा फटका बसला असून त्यामुळे या काळातील लागवड संथगतीने सुरू होती.

















