सांगली : जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर ऊस लागवड, आडसाली लागवड घटली

सांगली : जिल्ह्याचा विचार करता आडसाली हंगामातील दोन हजार १४९ हेक्टरने क्षेत्र घटले आहे. पूर्व, सुरू हंगामातील क्षेत्र वाढले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरअखेर सततच्या पावसाचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरअखेर संततधार पाऊस सुरू होता. शेतात पाणी साचून राहिले. आडसाली हंगामातील ऊस लागवड खोळंबली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली हंगामापेक्षा पूर्व आणि सुरू हंगामात ऊस लागवड करण्यास पसंती दिली. त्यामुळे २०२५-२६ या हंगामात जिल्ह्याचे ऊसक्षेत्र १,३८,९०४ हेक्टरवर गेले आहे.

यंदा गाळपाला जाणारा पूर्व हंगामी २२ हजार ८०६ हेक्टर, तर सुरू हंगामी १७ हजार ७४८ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. २०२४-२५ मध्ये पूर्व हंगामात १८ हजार ६४८ हेक्टर, तर सुरू हंगामात १५ हजार २०२ हेक्टरवरील उसाचे गाळप झाले. यंदाच्या हंगामात पूर्व हंगामात चार हजार १२२ हेक्टर, सुरू हंगामात दोन हजार ५४६ हेक्टरने क्षेत्र वाढले. तर दुष्काळी असा शिक्का असलेल्या जत तालुक्यात यंदा १२ हजार हेक्टरहून अधिक म्हणजेच ३० हजार एकर ऊस क्षेत्र झाले आहे.

जतच्या माळावर फिरलेल्या ‘म्हैसाळ’च्या पाण्याने आता शिवार हिरवागार दिसू लागला आहे. पूर्वी जत तालुक्याची दुष्काळी अशी ओळख होती. मात्र तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे वाढल्याचे चित्र आहे. गतवर्षी गाळप झालेल्या हंगामात आटपाडी तालुक्यात २५३३, कवठेमहांकाळ तालुक्यात ४७२२ हेक्टरवर उसाची लागवड होती. यंदा या दोन्ही तालुक्यांत गाळपास जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here