सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या एका कार्यक्रमात आगामी गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करारास प्रारंभ करण्यात आला. यावेळी अनिल सुनील दणाणे (शिंगणापूर), दादासो विष्णू मोहिते ( येतगाव ), पोपट राजाराम जाधव ( सावंतपूर), मारुती विष्णू पवार ( बलवडी) या तोडणी वाहतूक करणाऱ्या पाच कंत्राटदारांना प्रातिनिधीक स्वरुपात मोहनराव कदम यांच्या हस्ते करारपत्र घेऊन करारबद्ध करण्यात आले.
यावेळी माजी आमदार कदम म्हणाले, कारखान्याने सभासद, शेतकऱ्यांचे तसेच तोडणी, वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांचे हित जोपासले आहे. उसाचे उत्पादन वाढीसाठी ७० शेतकऱ्यांच्या शेतीवर प्राथमिक स्वरूपात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे खर्चामध्ये बचत होऊन उत्पादन वाढीस मदत होणार आहे. ऊस तोडणी, वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांनी कारखान्यास आपले करार करावेत. यावेळी पी. के. सूर्यवंशी यांनी स्वागत केले. उपशेती अधिकारी वैभव जाधव यांनी आभार मानले. संचालक बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, पोपटराव महिंद, दिलीपराव सूर्यवंशी, युवराज कदम, तानाजीराव शिंदे, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, शिवाजी काळेबाग, संभाजी जगताप, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम आदी उपस्थित होते.