सांगली : ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा ट्रॅक्टर, ट्रेलरला जीपीएस लावण्याच्या निर्णयाला विरोध

सांगली : केंद्र शासनाने ट्रॅक्टर व ट्रेलरवर अत्याधुनिक उपकरणे लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस, इव्हेंट डेटा रेकॉर्डर बसविणे सक्तीचे केले आहे. हे नियम तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने केंद्रीय रस्ते वाहतूक सचिव यांच्याकडे केली आहे. याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय मोटार वाहन नियमातील सुधारणा नियमांनुसार ट्रॅक्टरला आधुनिक यंत्रसामुग्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित नियमांमुळे प्रत्येकी किमान ३० हजार अतिरिक्त खर्च वाढेल. सर्व बाबींचा विचार करून कृषी ट्रॅक्टर व ट्रेलरसाठीचे प्रस्तावित नियम मागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून साधे, स्वस्त व व्यवहार्य पर्याय स्वीकारावेत.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी बहुतांश वेळा कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी करतात आणि त्याचा उपयोग मुख्यतः शेती कामासाठी करतात. अनेक ठिकाणी शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असतो, पण ट्रेलर नसतो किंवा ट्रेलर असतो, पण वेगळा चालक नसतो. त्यामुळे उपकरणांचा पूर्ण उपयोग करणे अवघड जाते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे मूलभूत शेतीचे साधन आहे. त्यामुळे ट्रॅक्टरला आधुनिक उपकरणे लावण्याच्या प्रक्रियेतून वगळावे. या निवेदनावर राजू शेट्टी, पृथ्वीराज पवार, संदीप राजोबा, रावसाहेब अबदान, तानाजी पाटील, विनोद पाटील, विठ्ठल पाटील, दादा पाटील, श्रीकृष्ण पाटील, संदीप मगदूम, गणेश गावडे, प्रकाश पोवार, दत्ता बाबर आदींची स्वाक्षरी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here