सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम गतीने सुरू असताना साखर कारखान्यांकडून ऊस बिले देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दलचे प्रादेशिक सहसंचालक सुप्रिया आरेकर-पाटील यांना निवेदन दिले. कारखाने सुरू होऊन सव्वा महिना झाला. सोळा कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. परंतु दोनच कारखान्यांनी ऊसबिले जमा केलीत. सोनहिरा साखर कारखान्याने त्यांचा एफआरपी ३४६३ रुपये १४ पैसे व क्रांती सहकारी साखर कारखान्याचा ३३६७ रुपये ५३ पैसे असताना कारखान्यांनी ३३०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसविले जमा केली आहेत. एकरकमी एफआरपी न दिल्यास आणि वेळेत ऊस बिले न दिल्यास या कारखान्यांविरोधात हायकोर्टात दाद मागू असा इशारा स्वाभिमाननी शेतकरी संघटनेने दिला आहे.
साखर कारखान्यांनी उच्च न्यायालयाने एकरकमी आदेशाचा एफआरपी देण्याच्या अपमान केला आहे. अध्यक्ष, कार्यकारी संचालक, संचालक मंडळांना उर्वरित उसाचे बिल उत्पादकांच्या खात्यावर तत्काळ वर्ग करण्याचे आदेश द्यावेत. उच्च न्यायालयाचा अपमान केल्याने अध्यक्ष, कार्यकारी संचालक तसेच संचालक मंडळावर प्रशासनाने तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत कारवाई न केल्यास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे अवमान याचिका दाखल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी दिला. राजोबा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने एक नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. केवळ दोन साखर कारखान्यांनीच गाळप उसाचे बिल दिले आहे. उर्वरित कारखान्यांनी बिले दिली नाहीत. ऊस उत्पादकांच्या खात्यावर एफआरपीपेक्षा कमी रक्कम जमा केली जात आहे. यावेळी बाळासाहेब पाटील, संदीप चौगुले, भाऊसो चौगुले, राजू पाटील, नितेश कोगनोळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















