सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या २६ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत आमदार डॉ. विश्वजित कदम व त्यांच्या पत्नी स्वप्नालीताई कदम यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार विशाल पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी, संचालक शांताराम कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, संचालक दीपक भोसले आदी उपस्थित होते. कारखाना चालू गळीत हंगामात १३ लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळप झाल्यास प्रतिटन ३३०० रुपयापेक्षा जादा ऊस दर देईल. त्यापुढे जेवढे उच्चांकी गाळप तेवढा उच्चांकी दर दिला जाईल, असा विश्वास आमदार कदम यांनी व्यक्त केला. कारखान्यातील सर्व कामगारांना १० टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
यावेळी विश्वजित कदम म्हणाले की, चालू गळीत हंगामात कारखाना १४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याने साखर उत्पादन व विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही चांगल्या प्रकारे चालवले आहेत. अनेक पुरस्कार मिळवून कारखान्याने देशातील सर्वोत्कृष्ट हा बहुमान मिळवला आहे. विक्रमी ऊस उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने कारखान्याने शेतकऱ्यांसाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. यावेळी, खासदार विशाल पाटील यांचे भाषण झाले. कार्यकारी संचालक एस. एफ. कदम यांनी स्वागत केले. संचालक रघुनाथराव कदम, शांताराम कदम, जितेश कदम, दिगंबर जाधव, ऋषिकेश लाड, विजयकुमार चोपडे, सतीश पाटील, संचालक भीमराव मोहिते, बापूसो पाटील, पी. सी. जाधव, महेश कदम, मालन मोहिते, सरपंच संतोष करांडे, इंद्रजित साळुंखे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.












