सांगली : जिल्ह्यात उसाची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे, पण ऊस तोडणी मजुरांची संख्या त्यामानाने वाढत नाही. त्यामुळे ऊस तोडणी लवकर व्हावी यासाठी साखर कारखान्यांकडून हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊस तोडणी केली जाते. ‘हार्वेस्टर’ यंत्रामुळे ऊस तोडणी जलद आणि सुलभ झाली तरी त्याचा वेगळाच फटका पशुपालकांना बसत आहे. मशीनद्वारे ऊस तोडणीवेळी उसाच्या वाढ्याचा हिरवा चारा जवळपास पूर्णपणे नष्ट होतो. हार्वेस्टर ऊस बुडख्यापासून शेंड्यापर्यंत सूक्ष्म तुकडे करत असल्याने वाढे सलग पालापाचोळ्यात रुपांतरित होते आणि जमिनीवर पसरते. हा चारा गोळा करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीही उरत नाही. त्यामुळे वाळवा तालुक्यात हिरव्या चाऱ्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ऊस तोडणीच्या हंगामात हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असे. परंतु यंदाच्या हंगामात परिस्थिती एकदम उलटी झाली आहे. सद्यस्थितीत ऊस लागवडीच्या हव्यासात चारा पिके जवळपास गायब झाली आहेत. त्यात आता यंत्राद्वारे तोडणीमुळे उसाचे वाढे उपलब्ध राहिले नाहीत. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर तीव्रतेने उभा आहे. हार्वेस्टरमुळे मजूर टंचाईचा प्रश्न सुटला. पण, शेतकरी, पशुपालकांसाठी हिरवा चारा हीच नवीन समस्या ठरत आहे. याबाबत शेतकरी जितेंद्र पाटील म्हणाले की, यापूर्वी ऊस गळीत हंगाम सुरू झाला की जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटत होता. परंतु आता मशीनद्वारे ऊस तोडणी झालेल्या क्षेत्रातून वाढे, हिरवा चारा अजिबात मिळत नाही. कापूसखेड येथील शेतकरी सूर्यकांत पाटील यांनी सध्या मशीनद्वारे ऊस तोडणी प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उसाचे वाढे कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. काही दिवसांनी हिरव्या चाऱ्याची टंचाई भासेल असे सांगितले.

















