सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात प्रती टन ३,५०० रुपये ऊस दर दिला आहे. ही रक्कम कारखान्याच्या एफआरपीपेक्षा जास्त आहे, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. आज, शुक्रवार दि. ११ पासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यंदा, गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याचे ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. प्रतिदिन ५१०० टनप्रमाणे गाळप होत आहे. आजअखेर १ लाख ७० हजार ७०० टन गाळप होऊन सरासरी ११.४४ टक्के साखर उताऱ्याने १ लाख ६१ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्ष वैभव नायकवडी म्हणाले की, उसाला प्रतिटन ३,५०० रुपयांप्रमाणे दरानुसार बिले जमा केली जात आहेत. कारखान्याने ३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ५१,१६९ टन उसाला ३५०० रुपयांप्रमाणे १७ कोटी ९० लाख ९२ हजार रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. सद्यस्थितीत साखरेचा उत्पादन खर्च, तोडणी- वाहतूक खर्च, देखभाल-दुरुस्ती खर्च, बँकांचे व्याज या बाबी पाहता साखरेच्या दरात वाढ करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने साखरेची एमएसपी ४५०० रुपये प्रतिक्विंटल करावी. एफआरपी हा साखरेच्या विक्री दराशी निगडित असावा. यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक गौरव नायकवडी, अरविंद कदम, बापूसो पाटील, तानाजी निकम, तुकाराम डवंग, विश्वास थोरात, शिवाजी खामकर, शरद थोरात, संभाजीराव पाटील, रामचंद्र पाटील, गंगाराम सूर्यवंशी, शिवाजी जावीर, शरद माळी, लक्ष्मण शिंदे, विशाखा कदम, जयश्री अहिर, वैशाली मोहिते, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सचिव मुकेश पवार आदी उपस्थित होते.


















