सांगली- माणगंगा साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू नाही : सहकारमंत्र्यांची आ. पडळकर यांना माहिती

सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची कोणतीही विक्री प्रक्रिया सुरू केली नाही, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सद्यःस्थितीत साखर कारखान्यावर एकूण १८४ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी आहे. मात्र, सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सध्या कोणतीही नवीन मालमत्ता विक्री प्रक्रिया सुरू नाही. लिलाव प्रक्रियेबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांना १२ जून २०२५ रोजी दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.

माणगंगा साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्यास १२२ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. बँकेने कर्जाच्या थकबाकीपोटी कारखान्याची २०८ एकर जमीन, इमारत, प्लांट, मशिनरी आदी मालमत्तेची तारण रजिस्टर मॉर्गेज डिडद्वारे घेतलेली आहे. ३१ मार्च २०२२ रोजी बँकेने ७५ कोटी ९४ लाख रुपयांस कारखाना स्वतः खरेदी केल्याचा दाखला केला आहे. १ जून २०२० रोजी त्याच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली. बँकेने सरफेसी कायद्यांतर्गत मालमत्तेवर कारवाई केली. त्याविरोधात बँक ऑफ इंडियाने पुणे येथील ऋण वसुली न्यायाधिकरणामध्ये दावा दाखल केला होता. २४ मे २०२१ रोजी डीआरटी कोर्टाने ‘जैसे थे’ आदेश देत, कारवाईवर स्थगिती दिली होती. या निर्णयामुळे कारखाना सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी, कामगार व सभासदांमध्ये दिलासा व्यक्त होत असल्याचे आमदार पडळकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here