सांगली: जिल्ह्यात यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गाळपाला सुरुवात झाली. अनेक कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे सूत्र अवलंबले. सलग चार महिने झालेल्या पावसामुळे जमिनीत ओल राहिली. रस्त्याकडील ऊस लवकर गेला, मात्र आडसाली क्षेत्र संपल्यानंतर खऱ्या अर्थाने अडचणी वाढल्या. सभासदांनी वेळेवर नोंदणी करूनही तोडणी वेळेत झाली नाही, अशी तक्रार आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक झाली. गळीत हंगाम लवकर आटोपत असला तरी अनेकांवर स्वतःचा ऊस पेटवून तोडण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील अनेक कारखान्यांवर शेतकऱ्यांचा रोष राहिला. शेती विभाग मजुरांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. ऊस तोडणी मजुरांना ‘हात ओले’ केल्यास ऊस तत्काळ तोडला जात असल्याचे चित्र दिसले. गट कार्यालयात वारंवार चौकशी करूनही ‘उद्या ट्रक-ट्रॅक्टर येईल’ अशी आश्वासनेच मिळाली. कारखान्यांनी बाहेरील गावातील उसाला प्राधान्य दिल्याची नाराजी व्यक्त होत आहे. ट्रॅक्टर व बैलगाडी अडकल्यास त्याचा खर्च शेतकऱ्यांवर पडला. पुढील गाळप हंगामात नियोजन सुधारावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांतून अपेक्षा व्यक्त होत आहे.


















