सांगली : चिक्की गुळाची आवक, मागणीही वाढली; प्रतीक्विंटल ४५०० ते ५५०० पर्यंत मिळतोय दर

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डात गुळाची आवक वाढली आहे. गुळाचे उत्पादन घटल्याचा परिणाम दरात तेजी येण्यास कारणीभूत ठरत आहे. सध्या गुळाला प्रति क्विंटल ३८०० ते ४२०० रुपये दर मिळत आहे. तर संक्रांतीसाठी सध्या चिक्की गुळाची आवक वाढली आहे. सर्वसाधारणपणे आठवड्यातून चार दिवस ३०० ते ५०० क्विंटल आवक होते. सर्वसाधारण दर प्रतिक्विंटलला ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपये दरम्यान आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या सौद्यातही प्रतिक्विंटल ३,८०० ते ५,०८५ रुपये दर मिळाला होता. चिक्की गूळ २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, एक किलो, तसेच ३० किलोतही उपलब्ध आहे. केवळ सांगलीच्या बाजारात चिक्की गुळाची आवक होते. त्याला चांगली मागणी आहे.

रायबाग येथील शेतकरी सुरेश मारुती पुणेकर यांच्या गुळाचा सौदा ‘चेंबर’चे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांच्या दुकानात निघाला. देसाई यांच्या दुकानात आजच्या सौद्यात एक किलोसाठी प्रतिक्विंटल ४ हजार ७०० रुपये, अर्धा किलो गुळभेलीस ५ हजार ५० रुपये, २५० ग्रॅम गूळ भेलीला ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. व्यापारी अशोक पटेल, राम करण, विपुल शहा, गोविंद राजेश उपस्थित होते. सत्यविजय सेल्स कार्पोरेशनने गूळ खरेदी केला. सध्या नियमित गुळाची आवकही दररोज १५० ते २५० टन होत आहे. तर मकर संक्रांतीसाठी चिक्की गुळाची आवक दिवसाला ३०० ते ४०० रवे होत आहे. त्याचा दर प्रतिक्विंटलला ४,५०० ते ५,५०० रुपयांदरम्यान आहेत. यंदा उत्पादन घटल्याचा परिणाम दरवाढ होण्यात झाला आहे. सध्या ३० ते ४० ट्रक गुळाची आवक होत आहे असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here