सांगली : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात अतिवृष्टीचा फटका ऊस लागवडीवर बसला असल्याने पाच ते दहा टक्के क्षेत्र कमी होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दोन वर्षापूर्वीही सततच्या पावसाचा फटका ऊस लागवडीवर झाला होता. त्यामुळे ऊस लागवड करण्यास अडथळे निर्माण झाल्याने काही भागात कमी अधिक प्रमाणात लागवड झाली होती. यंदा आडसाली, पूर्वहंगाम या दोन्ही हंगामांतील ऊस लागवड आटोपली आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड शेतकरी करत आहे. सद्यःस्थितीला ८८ हजार २८२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.
सद्यःस्थितीला आडसाली हंगामातील ३२ हजार ४८८ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी हंगाम २०२५-२६ गाळपासाठी १ लाख ३८ हजार ९०४ हेक्टरवर लागवड झाली होती. यामध्ये आडसालीचे ४४ हजार ९१४ हेक्टरवर क्षेत्र होते. दोन वर्षापूर्वी २०२५-२६ मध्ये १८०० हेक्टरने क्षेत्र वाढले होते. गेल्या वर्षी कृष्णा आणि वारणा काठच्या पट्ट्यात मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला. त्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीची पूर्वमशागत खोळंबली. जून महिन्यात पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी मशागत उरकून लागवडीस प्रारंभ केला. परंतु त्यानंतरही संततधार पाऊस सुरू झाल्याने पुन्हा आडसाली हंगामातील ऊस लागवडीस अडथळे निर्माण झाले. शेतकऱ्यांचा आडसाली हंगामापेक्षा पूर्व हंगामी उसाच्या लागवडीकडे कल वाढला असल्याचे चित्र आहे. डिसेंबरपासून सुरू हंगामातील ऊस लागवड सुरू झाली. तरीही जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

















