सांगली : एकेकाळी शंभरावर गुऱ्हाळघरे असलेल्या शिराळा तालुक्यात यंदा अपवाद म्हणून कणदूर येथे गूळ निर्मिती झाली. शिराळा तालुका व लगतच्या शाहूवाडी तालुका येथील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेली आणि सर्वसाधारणपणे पाडव्यापर्यंत चालणारी गुऱ्हाळघरे यंदा पंधरवड्याआधीच बंद पडली आहेत. शाहूवाडी तालुक्यातील अनेक गुऱ्हाळ मालकांनी गूळ व काकवी विक्रीसाठी शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील गावागावांत, वाडी-वस्त्यांवर फिरता व्यवसाय केला. कामगारांचा तुटवडा, आर्थिक अडचणी, बाजारपेठेतील दराची गळचेपी आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे उद्योगासमोर अडचणींचा डोंगर उभा असल्याचे चित्र आहे.
याबाबत गुऱ्हाळ मालक सुभाष पाटील यांनी सांगितले की, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कामगारांचा मोठा तुटवडा जाणवला. त्याचा परिणाम संपूर्ण हंगामावर झाला. हा उद्योग कष्टाचा असून खर्चाएवढाही अपेक्षित दर मिळत नाही. रात्रंदिवस मेहनत करून गूळ बाजारात पाठवला तरी दराची खात्री नसते. व्यापारी ठरवतील तोच दर मान्य करावा लागतो. त्यामुळे गुऱ्हाळ बंद करून कारखान्याकडे ऊस वळवण्याची वेळ येत आहे. दरम्यान, कामगारांचा तीव्र तुटवडा, गेल्या तीन महिन्यांत दरात समाधानकारक वाढ न होणे, वाढते उत्पादन खर्च आणि आर्थिक ताळमेळ न बसणे या कारणांमुळे गुऱ्हाळ मालकांना हंगामाची लवकर सांगता करावी लागली.


















