सांगली : दुष्काळी भागात माणगंगा सहकारी साखर कारखाना उभारून दिवंगत बाबासाहेब देशमुख आणि आमदार अण्णासाहेब लेंगरे यांच्यासह अनेक नेत्यांनी आटपाडी तालुक्याला आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला होता. कारखाना काही वर्षे सुरळीत चालला. पण शेवटी थकीत कर्जामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला. आठ वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्यामुळे शेतकरी, कामगार संकटात सापडले आहेत. सद्यस्थितीत कारखाना सुरू करण्यावरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. माणगंगा कारखाना सुरू करा, तो सहकार तत्त्वावरच चालवा अशी शेतकरी व सभासदांची अपेक्षा आहे. मात्र, नेत्यांच्या राजकीय डावपेचांमुळे कारखाना पुन्हा सुरू होईल की नाही, याची अजूनही खात्री नाही.
साखर कारखान्याची निवडणूक दोन वर्षांपूर्वी झाली, तेव्हा जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी कारखान्याची निवडणूक लढवली, तो बिनविरोध करून ताबा घेतला. कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, एकही हंगाम पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. जयंत पाटील यांच्यावर कारखाना ताब्यात जाण्यापासून रोखल्याचा आरोप अमरसिंह देशमुख यांनी केला आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांनीही प्रत्युत्तर देत “मीच धुराडे पेटवणार”, असे भाष्य केले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी माणगंगा कारखाना सहकार तत्त्वावरच राहिला पाहिजे, असे ठामपणे सांगितले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अमरसिंह देशमुख यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मदत मिळावी, अशी मागणी केली होती. सध्या कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडे आहे आणि तो विक्रीसाठी ठेवायचा की तो चालवायचा हे त्यांनीच ठरवायचे आहे.