सांगली : दत्त इंडिया कंपनीकडून दोन वर्षांच्या हप्त्याची रक्कम रुपये ५८ कोटी न मिळाल्याने वसुलीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसंतदादा साखर कारखान्याची चार एकर जमीन विकण्याचा घाट घातला आहे. जमीन विकण्याचे जाहीर केल्याने कारखान्याच्या सभासदांत संभ्रम झाला आहे. खरेतर हप्त्याची येणेबाकी दत्त इंडियाकडून आहे. कायद्याने कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. वसुलीचे अनेक मार्ग उपलब्ध असताना जमीन विक्रीचा पर्यायच का वापरला आहे हे ऊस पुरवठादार व शेतकरी सभासदांना समजत नाही, आम्ही जमीन विकू देणार नाही, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
संघटनेचे नेते संजय कोले यांनी निवेदनात म्हटले आहे की, कारखाना चुकीच्या कारभारामुळे डबघाईला येऊन बंद पडला. शेतकऱ्यांची ऊसबिले, ठेवी, मटेरियल, सुटे भाग पुरवठादार, विविध बँका, कामगार, वाहतूकदार, कर्मचाऱ्यांची शेकडो कोटींची देणी थकली. कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी संघटनेने २०१६ मध्ये शेतकरी व कामगारांचे आंदोलन उभे केले. तेव्हा हा प्रश्न सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगितला. पाठपुरावा केल्यानेच कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचे ठरले.
वसंतदादा साखर कारखान्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी फार त्याग केला आहे. आजही त्यांच्या ठेवी व २०१३-१४ ची ऊसबिले तसेच कामगारांची देणी मिळालेली नाहीत. कारखान्याची जमीन विकण्याचे मध्यवर्ती बँकेने जाहीर केल्याने सभासद हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात वसंतदादा गट, भाजप तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी हातात हात घालून वाटचाल करू लागल्याचे चित्र आहे. वसंतदादा कारखाना असो की, जिल्हा बँक, शेतकऱ्यांच्या जीवावरच टिकून आहेत. हे संचालकांनी लक्षात ठेवावे. संघटना जमीन अशी विकू देणार नाही. त्यासाठी आंदोलनही करू, असा इशारा कोले यांनी दिला आहे.