सांगली : “विश्वास व विराज उद्योग समूह हे एक कुटुंब आहे. संस्थेतील प्रत्येक घटक प्रगतिपथावर असून, मानसिंगराव नाईक कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांची काळजी घेतात. त्यांनी महिलांसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण केले. त्यातून महिलांना विविध खेळ, व्यावसायिक प्रशिक्षण, पाककला, गुणगौरव अशा उपक्रमांतून आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. शेती व घरापुरत्या मर्यादित असलेल्या महिलांना यामुळे प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे असे मत आपला बाजार समूहाच्या अध्यक्षा सुनीता नाईक यांनी व्यक्त केले. चिखली येथील ‘विश्वास’ कारखाना स्थळावरील चिंतन मंडपात गणेशोत्सवानिमित्त ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी नाईक म्हणाल्या की, ग्रामीण व डोंगराळ भागातील महिलांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे जाणीवपूर्वक काम विश्वास उद्योग समूह व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले आहे. शेतीचे पाणी, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रस्ते, पूल, तसेच गावातील अंतर्गत रस्ते, पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून झाले आहे. यावेळी विजेत्यांना बक्षिसे सुनीता नाईक यांच्या हस्ते देण्यात आली. तेजश्री साळुंखे, प्रियांका पाटील, विजय पाटील, विजय देशमुख, दत्तात्रय पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. विजय पाटील यांनी स्वागत केले.