सांगली : विश्वास सहकारी साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना एक रुपयात उसाचे रोप वाटप

सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास कारखान्याच्या रोपवाटिकेतील ऊस रोपे वाटप योजनेचा प्रारंभ कारखान्याचे संचालक व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते झाला. कारखान्याने सुरू केलेल्या एक रुपयात उसाचे शुद्ध व उच्च प्रतीचे रोप कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्याच्या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमध्ये प्रति शेतकऱ्याच्या २० गुंठे क्षेत्रास अथवा अधिकाधिक तीन हजार रोपे देण्यात येतील. ही रोपे एक रुपया प्रतिरोपप्रमाणे बिनव्याजी देण्यात येतील. या रकमेची वसुली येणाऱ्या ऊस बिलातून केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.

यावेळी नाईक म्हणाले कि, कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. उसाच्या प्रतिरोपास पन्नास टक्के अनुदान व पन्नास टक्के बिनव्याजी उधारीवर एक रुपयाप्रमाणे देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ज्या शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली आहे, त्यांना अर्जाच्या क्रमांकानुसार रोपाचे वाटप होईल. रोप लागवडीने उत्पादनात वाढ, वेळेची बचत होते. शेतकऱ्यांना शुद्ध निरोगी रोपांचा पुरवठा करणे हा यामागील उद्देश आहे. यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी ए. ए. पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्षेत्रातील शेतकरी संजय शेवडे, रेखा जगदाळे (मांगले), दिलीप सांमुळे, संपत देसाई, सविता देसाई, गोपाळा देसाई, संदीप देसाई, समाधान देसाई ( भाटशिरगाव) यांना रोपांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here