सांगली : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आडसाली लागवडीचा हंगाम सुरू आहे. बियाण्या योग्य ऊस व मजुरांची टंचाई भासत आहे. शेतकरी रोप लागवडीकडे वळत आहेत. काही वेळा निकृष्ट रोपे मिळाल्याने नुकसान होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे उसाची कांडी लागवड करू शकत नाही. रोप लागणीची उगवणक्षमता चांगली असते. त्यामुळे कारखान्यामार्फत तेथील रोपवाटिकेतून शुद्ध व उच्च प्रतीची उसाची रोपे पन्नास टक्के अनुदानासह प्रतिरोप एक रुपयाप्रमाणे देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, असे आवाहन अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. यावेळी संचालक, शेती अधिकारी, ऊस विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
दरम्यान, कारखान्याच्या ऊस बियाणे प्रकल्पास विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष व कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी भेट दिली. त्यांना ऊस विकास विभागाकडून प्रकल्पाची व बनविण्यात येणाऱ्या ऊस बियाणांची माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, ही रोपे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना पन्नास टक्के अनुदानावर देण्याचे ठरविले आहे. ही रोपे शेतकऱ्यांना एक रुपया या सवलतीच्या दरात व पतीवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या रोपांची रक्कम बिनव्याजी असून पुढील वर्षी येणाऱ्या बियाणे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून घेतली केली जाईल. त्यांच्यासमवेत कार्यकारी संचालक अमोल पाटील, शेती अधिकारी ए. ए. पाटील, जल अभियंता दिनकर महिंद, उप ऊस विकास अधिकारी संदीप पाटील, वरिष्ठ कृषी पर्यवेक्षक आनंदा गावडे आदी उपस्थित होते.