सांगली : दिघंची येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार राजेंद्र देशमुख, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सचिव एच. यू. पवार, बीडीएस बँकेचे चेअरमन बाळासाहेब शिरकांडे आदी उपस्थित होते.
ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी आरक्षित पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९५३ मध्ये झाली असून, संस्थेच्या ३२ शाळा आहेत. दोन कोटी २७ लाख खर्च करून बांधलेल्या विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण या प्रसंगी झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महिलांनी उद्योग सुरू करावेत, त्यासाठी शासन व्याजाची जबाबदारी उचलेल. महिला कर्ज बुडवत नाहीत. म्हणून बीडीएस बँकेनेही महिलांना कर्जपुरवठा वाढवावा.. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख करताना राजेवाडी तलाव कधीही पाण्याविना राहणार नसल्याचे आश्वासन दिले.