सांगली : शिराळा तालुक्यात सततच्या पावसाने व वारणा नदीला आलेला पूर आणि बदलत्या हवामानामुळे दोन महिन्यांपासून ऊस पिकावर करपा व लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी घट होण्याची भीती वर्तवली जात आहे. कृषी खात्याने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजनेसाठी तालुकाभर मार्गदर्शन करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. तालुक्यात उसाचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ५०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात १० हजार ८ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. यंदा पावसाने लवकर हजेरी दिल्याने आंतरमशागती झालेल्या नाहीत. पाणी साचून राहिल्याने औषध फवारणी व रासायनिक खतांचा वापरही करता आलेला नाही. याचा परिणाम उसाच्या वाढीवर झाला आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून उसावर करपा व सध्या लोकरी मावा या दोन रोगांनी थैमान घातले आहे. रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. अजूनही कारखाने सुरू होण्यासाठी कालावधी असल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तालुक्यात एकूण १० हजार ८ हेक्टरवर ऊस लागवड झाली असली तरी यातील ४ हजार ३५० हेक्टर क्षेत्रातील खोडवा ऊस आहे. आडसाली लावण १ हजार २३३ हेक्टर असून पूर्व हंगामी लागवड २०८० हेक्टर आहे. चालू उसाची लागवड २३४५ हेक्टर आहे. या सर्वच क्षेत्राला लोकरी मावा, करपा रोगाचा फटका बसण्याची शक्यता आहे.