सांगली :ऊस नर्सरी व्यवसायात दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी येथील अभयसिंह माने यांनी आधुनिक पद्धतीने बेणे मळा विकसित केला आहे. माने हे कृषी पदवीधर असून त्यांनी बेणे मळ्यासाठी त्यांनी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बेणे मळा तयार करताना एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हवामानातील बदल, पाऊस, वारा तसेच रोग व किडींचा अंदाज घेऊन योग्य वेळी उपाययोजना करता येतात. याशिवाय पाण्याचे नियोजन, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन आणि पिकांच्या संरक्षणाबाबतही अचूक मार्गदर्शन मिळते. रोग व किडींचा संभाव्य प्रादुर्भाव दोन दिवस आधीच लक्षात येत असल्याने त्यावर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होते असे त्यांनी सांगितले.
माने यांनी हे तंत्रज्ञान राजारामबापू साखर कारखान्याच्या माध्यमातून बसविले असून ते सुमारे वीस गुंठ्यांपासून अडीच एकरपर्यंत प्रभावीपणे कार्य करते. याची किंमत सुमारे २५ हजार रुपये आहे. ‘हवामान पीक अॅग्रो’ या मोबाईल अॅपद्वारे अभयसिंह माने यांना दररोज हवामान आणि पिकांबाबतची माहिती मिळते आणि त्यानुसार पुढील नियोजन केले जाते. वडिलांच्या शेती व्यवसायाला जोड म्हणून अभयसिंह यांनी ऊस नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी नर्सरीच्या शेजारील वडिलोपार्जित शेतात ए. आय. तंत्रज्ञान बसवून बेणे मळा तयार केला. त्यांनी कोईमतूर येथील संशोधन केंद्रातून पहिल्या टप्प्यातील ऊस बियाणाची रोपे आणून बेणे मळा विकसित केला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे ऊस शेती करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांना दर्जेदार आणि निरोगी बियाणे मिळून उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. माने यांनी आतापर्यंत आपल्या नर्सरीत सुमारे २१ लाख रोपांची निर्मिती केली आहे.


















