सातारा : कराड तालुक्यातील शेवाळेवाडी-म्हासोली येथील अथणी शुगर लिमिटेड – रयत युनिट कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कारखान्याकडे ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून मजूर कुटूंबे येत असतात. त्यांचे आरोग्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबिर होणे अत्यंत गरजेचे आहे. कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजीत केल्याची माहिती ॲड. उदयसिंह पाटील यांनी यावेळी दिली.
शिबिरामध्ये २५० मजुरांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, कुष्ठरोग, क्षयरोग, गरोदर मातांची तपासणी, लहान मुलांचे लसीकरण करून त्यांना मोफत औषध व सोयी सुविधा देण्यात आल्या. शिबिराच्या अध्यक्षस्थानी रयत युनिटचे हेड रविंद्र देशमुख होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, चीफ अकाउंटंट शैलेश देशमुख, चीफ इंजिनिअर फाळके, मुख्य शेती अधिकारी विनोद पाटील, ऊस पुरवठा अधिकारी एम. एम. पाटील, प्रतीक पाटील, डॉ. चंद्रकांत सातपुते, वैद्यकीय अधिकारी राजनंदिनी मोरे, डॉ. के. एम. सुकरे, डॉ. शेखर कोगनोळकर, डॉ. सुहास यादव उपस्थित होते.


















