सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला आहे. सध्या नऊ सहकारी व आठ खासगी असे १७ साखर कारखाने गाळप करत आहेत. यापैकी १५ साखर कारखान्यांनी २९ लाख ५२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केलेले आहे. त्यातून २५ लाख ३५ हजार क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे. सरासरी ८.५९ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यापूर्वीच्या दोन, तीन हंगामात खासगी कारखाने गाळपात आघाडीवर राहात होते. मात्र, यावर्षी आतापर्यंतची परिस्थिती पाहता सहकारी साखर कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी सर्वाधिक उसाचे गाळप करून साखर निर्मितीत आघाडी घेतली आहे. नऊ साखर कारखान्यांनी १५,४५,१४१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १५,७१,३८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. या सर्व कारखान्यांना सरासरी १०.१७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. साखर उताऱ्यात सर्वच कारखाने मागे पडले आहेत. त्याचा परिणाम साखर निर्मितीवर होण्याची शक्यता आहे. सहा खासगी साखर कारखान्यांनी १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करत ९,६४,१२५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी ६.८५ टक्के साखर उतारा मिळाला आहे असे साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार दिसून येते.


















