सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या कार्यस्थळावर पर्यावरणपूरक ऊस व्यवस्थापन प्रकल्प व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत माजी प्रक्षेत्र संचालक डॉ. सुभाष ढाणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, प्रकल्प समन्वयक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी चेअमरन यशवंतराव साळुंखे, व्हा. चेअरमन, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक विश्वास शेडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कृषी धोरणाची माहिती देत विविध अनुदान योजनांची सविस्तर माहिती दिली. ऊस उत्पादन वाढीसाठी मातीचे अनन्यसाधारण महत्त्व असून, माती व पाणी परीक्षणासाठी बँकेमार्फत अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करावा, यासाठीही बँक प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य देत असल्याचे स्पष्ट केले. डॉ. सुभाष ढाणे यांनी कृषी विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या माती संवर्धन, पीक सुधारणा, रोग नियंत्रण व सुधारित ऊस जातींवरील संशोधनाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी विद्यापीठांनी दिलेल्या शास्त्रीय शिफारशींचा अवलंब केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके म्हणाले, पर्यावरणपूरक ऊस संवर्धन प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सरासरी १८ टक्के वाढ झाली आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. ऊस तोडणी नियोजनासाठी आडसाली २० टक्के, पूर्वहंगामी ३० ते ३५ टक्के, सुरू १० टक्के आणि खोडवा ५० टक्के असे संतुलित प्रमाण असणे आवश्यक आहे. पूर्ण हंगामी व सुरू ऊस लागवडीस प्राधान्य दिल्यास पीक फेरपालट होऊन जमिनीची उत्पादकता वाढत. शेतकऱ्यांनी प्रमाणित नर्सरीमधूनच ऊस रोपे वापरावीत, सुपर केन नर्सरी उभाराव्यात आणि खोडवा ऊस पिकाचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करावे, असेही ते म्हणाले. रणजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

















