सातारा : जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे एकूण १७ साखर कारखाने आहेत. यावर्षी राज्य शासनाने एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी त्यापूर्वीच गाळपासही सुरुवात केली. या कारखान्यांनी दर जाहीर न करताच हंगाम सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. ‘स्वाभिमानी’ने उसाला प्रति टन ३७५१ रुपये दराची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेची बैठक घेतली. यामध्ये बहुतांश कारखान्यांनी ३,५०० रुपये दर जाहीर केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी कराड तालुक्यात आंदोलन केले. कारखान्याची वाहने अडवली. त्यामुळे कारखाना प्रशासनाने दोन दिवसांत प्रतीटन ३,५०० रुपये दर जाहीर केला. त्यापाठोपाठ स्वाभिमानी संघटनेने कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर आंदोलन केले. तेथेही दर जाहीर करण्यासाठी मुदत मागितली. त्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कारखानदार व संघटनेचे बैठक बोलावली. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, सचिन नलवडे आदी उपस्थित होते. सुमारे तीन तासांच्या बैठकीनंतर ऊस दर जाहीर करण्यात आला. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शिवनेरी कारखान्याने टनाला ३,५०० रुपये तर खटावमधील पडळच्या कारखान्याने ३,३०० रुपये दर जाहीर केला. आता उर्वरीत कारखाने दर जाहीर करतील, असे सांगण्यात आले.


















