सातारा: उसाचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेणखत, कारखान्याचे कंपोस्ट खत, मळी, हिरवळीची खते, वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडी घालून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याची गरज आहे. तरच एकरी शंभर टन उसाचे उत्पन्न काढणे उद्दिष्ट साध्य करता येईल. सद्यस्थितीत एकरी १०० टन उत्पादन काढण्यासाठी उसाची ८६०३२ ही सर्वात चांगली जात आहे अशी माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी दिली. कराड तालुक्यातील किवड येथे विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायत व माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
सुरेश माने म्हणाले की, उसाची संख्या नियंत्रण असायला हवी. एका एकरात ४० ते ४५ हजार ऊस असावेत. शेतकऱ्यांनी योग्य ती रासायनिक खते वापरावीत. लागण केल्यानंतर दोन आळवणी व चार फवारण्या कराव्यात. ऊस लागणपूर्व मशागत करताना साडेचार ते सहा फूट सरी असावी. सरीवर दोन फुटावर एक डोळा किंवा एक रोप अशा पद्धतीची लागण करावी. यावेळी संगिता साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विजय साळुंखे, सरपंच प्रदीप काशीद, उपसरपंच प्रभाकर पवार, माजी उपसरपंच सुनिल साळुंखे, रामचंद्र साळुंखे, मोहन साळुंखे, अनिल नळगुणे, देवस्थान कमिटी अध्यक्ष भानुदास साळुंखे, उपसरपंच सुनील साळुंखे, रामराव साळुंखे, रत्नाकर तांबे उपस्थित होते. माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे यांनी स्वागत केले. सुनील साळुंखे यांनी आभार मानले.


















