सातारा : जनता शिक्षण संस्था व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने येथील किसन वीर महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊसशेती’ या विषयावरील कार्यशाळा झाली. यावेळी बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे डॉ. विवेक भोईटे यांनी मार्गदर्शन केले. बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार अध्यक्षस्थानी होते. ऊस पिकाचे उत्पादन वाढवून शेतकरी व साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ४० टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ शक्य आहे, असे मत भोईटे यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. भोईटे म्हणाले की, एआयमुळे पिकाच्या वाढीविषयी, पाणी व खत व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोगनिदान, कीड नियंत्रण, ऊस पक्वता व साखर उतारा याची अचूक माहिती मिळते. ड्रिपद्वारे पाणीपुरवठा आणि आवश्यक त्या काळात खत देण्यामुळे पाणी, खत व मजुरी खर्चात बचत होऊन ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढते. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, संचालक केशवराव पाडळे, खजिनदार नारायणराव चौधरी, रयतचे भय्यासाहेब जाधवराव, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप यादव, मोहन भोसले, अनिरुद्ध गाढवे यांची उपस्थिती होती. मदन भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनोद वीर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आभार मानले