सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस पिकाचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे व साखर कारखान्याचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावा झाला. सहकार वर्षानिमित्त आयोजित या मेळाव्यात पुण्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट आणि बारामतीचे ग्रीकल्चर डेव्हल्पमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन यशवंतराव साळुंखे, माजी चेअरमन सर्जे राव सावंत, रामचंद्र जगदाळे, संचालक, अधिकारी व शेती ऑफिस स्टाफ आणि शेतकरी उपस्थित होते.
ग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे डॉ. विवेक भोईटे यांनी सांगितले की, पारंपारिक शेतीला तंत्रानाची जोड दिल्यामुळे निश्चितपणे पिक उत्पादनात वाढ होते. ग्रीकल्चर ट्रस्टने ५ वर्षे संशोधन करुन एआय तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादनातील वाढ सिद्ध केली आहे. उसासह सर्व पिकांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. एआय प्रणालीचा वापर करणेसाठी प्रती हेक्टरी रु. २५ हजार खर्च अपेक्षित आहे. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, राज्य शासन, साखर कारखाने अनुदान देणार आहेत. यात शेतकऱ्यांनाही आपला हिस्सा भरुन सहभागी व्हावे लागेल. कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनुदान देणार असून शेतकऱ्यांनी शेती विभागाच्या गट कार्यालयाशी संपर्क साधून आपली नावे द्यावीत, असे आवाहन केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. अशोक कडलग यांनी शुद्ध व प्रमाणित ऊस बियाणाचा वापर करा असे आवाहन केले.