सातारा : शेवाळेवाडी (म्हासोली) ता. कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या उसास प्रति मे. टन ३२०० रुपये प्रमाणे ऊस बिल यापूर्वी अदा केले आहे. आणखी प्रति मे. टन ६० रुपये ऊस बिल देणार असल्याची माहिती अथणी शुगर्सचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी. एफ.ओ योगेश पाटील यांनी दिली.
यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, अथनी शुगर्सचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ योगेश पाटील आणि युनिट हेड रविंद्र देशमुख उपस्थित होते. अथणी शुगर्स लि. (रयत युनिट) या कारखान्याने गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये ४.४४ लाख मे. टन गाळप केलेले असून या उसाला प्रति मे.टन ३२०० रुपये प्रमाणे एकरकमी ऊसबिल अदा केलेले आहे.
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रति मे. टन उसाला २० रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने साखर वितरण करण्यात येत आहे. व्यवस्थापनाने २०२४-२५ हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रति मे.टन ६० रुपये प्रमाणे दुसऱ्या हप्त्याचे बिल देण्याचे जाहीर केली आहे. त्यापोटीची रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येणार आहे. परिणामी, २०२४-२५ या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रति मे.टन एकूण ३२८० रुपये इतका ऊस दर देण्यात आलेला आहे. तरी सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.












