सातारा : वाढीव ऊस दरासाठी आंदोलन करण्याचा बळीराजा शेतकरी संघटनेचा निर्णय

सातारा : साखर कारखान्यांनी एफआरपी देऊन कायद्याच्या कचाट्यातून सुटून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटना व कारखानदार यांची बैठक झाली होती. त्यावेळी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जास्तीत जास्त दर देऊ असे लेखी आश्वासन दिले होते.याचा कारखानदारांना विसर पडला असून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने आंदोलक व शेतकरी संघटनांची फसवणूक केली आहे. आता साखर कारखानदारांनी २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला एफआरपी अधिक १००० रुपये द्यावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेने दिला.

बळीराजा शेतकरी संघटनेने याबाबचे निवेदन तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, प.महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, गणेश शेवाळे, मनोज उबाळे, दिगंबर जगताप, संपत जगताप यांनी हे निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, साखरेला आज चांगला भाव आहे. सर्वसाधारण ४० ते ४५ रुपये प्रति किलो साखरेला बाजारपेठेत दर असताना सुद्धा कारखानदार आम्हाला परवडत नाही अशा उलट्या बोंबा मारत आहेत. कृष्णा कारखान्याने एफआरपी अधिक १११ रुपये दिले. परंतु त्यांना अजून नऊशे रुपये देणे शक्य असतानासुद्धा त्यांनी ते दिले नाहीत. ऊस दरात शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here