सातारा : सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये विस्तारलेले कार्यक्षेत्र, हजारो ऊस उत्पादक सभासद आणि त्यावर अवलंबून असलेले ग्रामीण राजकारण यामुळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरते. ही निवडणूक कारखान्यापुरती मर्यादित न राहता दोन्ही जिल्ह्यांच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरते. कारखान्यातील सत्ताधारी गटाचा कार्यकाळ जून २०२६ च्या आसपास संपत आहे. आगामी निवडणुकीला जेमतेम सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. कारखान्यावर डॉ. सुरेश भोसले आणि आ. डॉ. अतुल भोसले यांची सत्ता आहे. आगामी निवडणूक दुरंगी होणार की गेल्या वेळेप्रमाणे तिरंगी होणार याबाबत सभासदांमध्ये चर्चा सुरू आहे.
कारखान्याला मोठ्या सत्तासंघर्षाची आणि सत्तांतराची पार्श्वभूमी आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी वाळवा तालुक्यात संपर्क दौरे सुरू केले आहेत. भोसले गटाने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसते. माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते गट सोशल मीडियातून सक्रीय झाला आहे. त्यामुळे कृष्णाकाठच्या गावागावात कारखाना निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तीन्ही गटांकडून निवडणूक ताकदीने लढवली जाईल, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. कारखान्याचा इतिहास पाहता सत्तासंघर्ष, गटबाजी आणि नाट्यमय घडामोडी लक्षात घेता बिनविरोधाची शक्यता कमी आहे.















