सातारा : सध्या जिल्ह्यात सर्वत्र गळीत हंगाम सुरू झाला आहे. साखर कारखान्यांसाठी ऊसतोड टोळ्या कारखान्यांवर दाखल झाल्या आहेत. जवळपास हजारो ऊस तोड कामगार विविध साखर कारखान्यांवर ऊसतोडणी करताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात लातूर, धाराशिव, बीड, जालना, सोलापूर या जिल्ह्यांतील मजुरांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आली आहेत. सोबत त्यांची मुलेही कारखाना परिसरात आहेत. दरवर्षी अनेक ऊसतोड मजूर कामगार जिल्ह्यात दाखल होतात. मात्र, ज्या गावांमध्ये, ज्या ठिकाणी त्यांच्या टोळ्या उतरलेल्या जातात, त्याच ठिकाणी तेथे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्येच ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मात्र, साखर शाळा असतानासुद्धा ही मुले उसाच्या फडात दिसून येत आहेत. ऊसतोड मुजारांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव समोर येत आहे.
सद्यस्थितीत साखर शाळेमध्ये परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेताना दिसतात. मात्र, कारखाना सुरू झाल्यानंतर दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन, त्यांना त्या शाळेत दाखल करून घेणे, हे या शाळेतील शिक्षकांचे आणि कारखाना व्यवस्थापनाचे काम असून, साखर शाळा फक्त कागदावर दिसून येत आहेत. ऊसतोड मजुरांची किती मुले या साखर शाळेत शिकत आहेत, हे पाहणे गरजेचे आहे. ऊसतोड मजुरांची मुले शाळेत न जाता आई-वडिलांसोबत उसाच्या फडात रमताना दिसत आहेत. ज्या ठिकाणी, ज्या गावांमध्ये टोळी उतरवली जाते, त्या ठिकाणाहून शाळेची व्यवस्था लांब असल्याने मुलांना उसाच्या फडातच बरोबर घेऊन जात आहेत.


















