सातारा : गेल्या पंधरा दिवसांपासून कराड, पाटण, माण, खटाव तालुक्यात मराठवाड्यातील ऊस तोडणी मजूर कुटूंबे मोठ्या संख्येने दाखल झाली आहेत. मात्र, वादळी पावसामुळे ऊस तोडणी कामगारांचे हाल होऊ लागले आहेत. पावसाने उसंत घेतली असली तरी अद्याप शिवारात पाणी आहे. ऊस तोडणी करताना थोडे अडथळे येत असले तरी शेतातून ऊस बाहेर काढताना कसरत करावी लागत आहे. शेताबाहेर बांधावर ऊस वाहून न्यावा लागत आहे. तोडणी मजुरांच्या राहण्यासाठी उभारलेल्या झोपड्यांमध्येही पाणी साचल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. जेवण, आंघोळ यासाठी हाल होत असल्याची स्थिती मजुरांच्या वस्तीच्या परिसरात दिसू लागली आहे.
म्हसवड- वीरकरवाडी येथील ऊसतोड महिला कामगार सुरेखा यादव यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून बिकट परिस्थिती असल्याचे सांगितले. अनेक कुटूंबे येथे आली. मात्र, पावसाने ऊस तोडणी बंद असल्यामुळे दैनंदिन गुजराण कशी करायची अशी स्थिती आहे. ऊस तोडणी सुरू असते तेव्हा उसाच्या वाड्याचे (वैरण) पैसे येतात. त्यावर ऊस तोड मजुरांचे कुटुंब चालते. अगोदर दिलेले तुटपुंजा ॲडव्हान्स गावाकडेच खर्च होतो. मात्र तोडीच ऊस तोडी बंद झाल्यामुळे साहित्य आणण्यास पैसे नाहीत. घराकडून आणलेले धान्य किती दिवस पुरणार, अनेक कुटुंबाची उपासमारीची वेळ आली आहे अशी स्थिती असल्याचे ऊस तोडणी कामगार प्रकाश चव्हाण यांनी सांगितले. गावकडे खूप पाऊस असल्याने आम्ही इकडे आलो. तर इथेही पाऊस पाठ सोडत नाही. जनावरांचे मोठे हाल होत आहेत. जनावरेही चिखलात उघड्यावर बांधावी लागत आहेत असे तोडणी कामगारांनी सांगितले.












