सातारा : सह्याद्री कारखान्याच्या गाळपास प्रारंभ, १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

सातारा : यशवंतनगर (ता. कन्हाड) येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ उत्साहात झाला. कारखान्याचे संचालक संजय गोरे व त्यांच्या पत्नी साधना गोरे यांच्या हस्ते, तसेच अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. सह्याद्री कारखाना यावर्षी किमान १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करेल. सर्वांनी साथ दिल्यास त्यापेक्षाही अधिक गळीत होऊ शकते. ‘सह्याद्री’चा नवीन प्लांट १५ नोव्हेंबरदरम्यान सुरू होणार आहे. त्यामुळे अधिक क्षमतेने गाळप करता येईल. उसाचे हेक्टरी उत्पन्न अधिक वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन माजी मंत्री तथा सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

बाळासाहेब पाटील म्हणाले की, साखर कारखान्यात जेवढे अधिक गळीत, तेवढा उत्पादन खर्च कमी होईल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घामाला दाम, चांगला मोबदला मिळण्यासाठी सर्वांनी ठामपणे सहकाराच्या पाठीशी उभे राहावे. माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल पाटील, संचालक जशराज पाटील, अजित पाटील चिखलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी उपयुक्त तानाजीराव साळुंखे, डॉ. विजय साळुंखे, संगीता साळुंखे, राजेंद्र चव्हाण, लक्ष्मी गायकवाड, आजी-माजी संचालक, ऊस उत्पादक सभासद आदी उपस्थित होते. संजय गोरे, सुनील माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब पाटील- सुपनेकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here