सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात बाहेरच्या जिल्ह्यातून ऊसतोड कामगार आले आहेत. साखर कारखान्यांनी या कामगारांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी ऊसतोड कामगारांसाठीच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. ऊसतोड महिलांचे कुठल्याही प्रकारचे शोषण होणार नाही याची दक्षताही घ्यावी, झाल्यास शोषण करणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करावे असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी प्रत्येक ऊसतोड कामगाराचा विमा उतरविला पाहिजे. कोणताही अपघात झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळू शकते, तसेच सर्व साखर कारखान्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडील सानुग्रह अनुदानासाठी समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवावेत. ऊसतोड कामगार उघड्यावर शौचासाठी जातात त्यांच्यासाठी मोबाईल टॉयलेटची साखर कारखान्यांनी व्यवस्था करावी. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मजुरांना दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी.


















