सातारा : रायगाव शुगर या साखर कारखान्याने शामगाव, चोराडे, गोरेगाव या विभागातील शेतकऱ्यांची ऊसबिले ऊस गाळप करून दहा महिने झाले, तरी अद्यापही दिले नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीने कारखाना प्रशासनास निवेदन देत शेतकऱ्यांना आठ दिवसांत ऊसबिल न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात शामगाव, पुसेसावळी विभागातील शेतकऱ्यांनी रायगाव शुगर या कारखान्यास ऊस घातला होता. या कारखान्यास ऊस घालून दहा महिने झाले आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर वारंवार हेलपाटे मारूनही कारखान्याने शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपयाही ऊसबिल दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत रोष होता.
या शेतकऱ्यांनी रयत संघटनेचे सचिन नलवडे, शिवाजी पाटील, विशाल पुस्तके, सौरभ चव्हाण, बापूराव पोळ, महेंद्र जाधव, शंकर पोळ, दादासो पोळ, संजय पोळ, नितीन चव्हाण, तात्यासो पिसाळ आदींना सोबत घेऊन कारखाना गाठला. ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांना दूरध्वनीवरून रायगाव शुगरनी शेतकऱ्यांना अद्यापही बिल न दिल्यामुळे या कारखान्यावर आरआरसीची कारवाई करावी. जोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण ऊसबिल मिळत नाही, तोपर्यंत रायगाव शुगरला नवीन गाळप हंगामासाठी परवाना देऊ नये, असे सांगितले. यावेळी साखर आयुक्तांनी या कारखान्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या वेळी कारखाने प्रशासनाने कारखान्याचे अध्यक्षांना दूरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सहा तारखेपर्यंत शेतकऱ्यांची पूर्ण बिले अदा करणार असल्याचे सांगितले. आठ दिवसांत शेतकऱ्यांची बिल जमा न झाल्यास कारखान्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नलवडे यांनी कारखाना प्रशासनास दिला.












