सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यावरणपूरक उस व्यवस्थापन प्रकल्प व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात झाली. पुण्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, अजिंक्यतारा कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते. यावेळी मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. सुभाष ढाणे, कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. बाळासाहेब सावंत, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व प्रकल्प समन्वयक डॉ. धर्मेद्रकुमार फाळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यशवंतराव साळुंखे यांनी पीक संवर्धन प्रकल्पा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालकांच्या सहकार्याने कारखान्याची प्रगती होत असल्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी सांगितले.
डॉ. ढाणे यांनी कृषी विद्यापीठामार्फत माती, पीक संवर्धन, रोग, सुधारित जाती याविषयी होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. कृषी विद्यापीठांनी सुचविलेल्या शिफारशीचा अवलंब करून, शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. तर डॉ. फाळके यांनी ऊस पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अजिंक्यतारा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आडसाली उसाचे प्रमाण जास्त असून, ते कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पूर्ण हंगामी व सुरू ऊस लागवडीस प्राधान्य द्यावे. त्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढते, असे त्यांनी सांगितले. डॉ. सरकाळे यांनी जिल्हा बँकेच्या कृषी धोरणाची आणि विविध अनुदान योजनांची माहिती दिली. संचालक विश्वास शेडगे यांनी स्वागत केले. रणजित चव्हाण यानी सूत्रसंचालन केले. व्हाइस चेअरमन नामदेव सावंत यांनी आभार मानले.

















