सातारा : सातारा तालुक्यातील रामकृष्णनगरच्या सनी दिलीप काळभोर या शेतकरी पुत्राने ऊस भरणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गाळप हंगामात ऊसतोड मजुरांची निर्माण होणारी समस्या सुटणार आहे. दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन यावर प्रभावी मार्ग काढण्याचे काम सनी काळभोर यांनी केले आहे. सनी यांनी ट्रेलरमध्ये ऊस भरण्याच्या उद्देशाने यंत्र तयार केले आहे. यंत्राच्या निर्मितीसाठी दोन लाखांहून अधिक खर्च आला.
सनी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. यंत्र निर्मितीसाठी त्यांनी २०२० पासून प्रत्यक्ष काम सुरू केले, तसेच यंत्र तयार करतेवेळी किमान जागेत बसणारे, सहज वाहतूक करण्यायोग्य असले पाहिजे याकडे प्राधान्याने लक्ष ठेवण्यात आले, तसेच या यंत्राचे आरेखन आणि निर्मितीसाठी चार महिने लागले. स्थानिक पातळीवर उपलब्ध लोखंड, नटबोल्ट, चेन, टायर, बेअरिंग, दातेरी चक्र आणि इंजिन यांचा वापर केला. हे यंत्र मजूर समस्येवर चांगलाच उतारा ठरले आहे. याबाबत सनी यांनी सांगितले की, ऊस भरण्याचे यंत्र एकूण ७५ फूट लांबीचे आहे. फोल्डिंग केल्यानंतर त्याची लांबी २५ फूट होते. हे यंत्र ट्रॅक्टर ट्रेलरला जोडले जाते. पट्टयावर उसाच्या मोळ्या टाकल्या जातात. इंजिनद्वारे पट्टे फिरत असल्याने उसाच्या मोळ्या थेट ट्रेलरमध्ये पडतात.