सातारा : येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात १२ लाख ३९ हजार ८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा १२.५७ टक्के राहिला आहे. या हंगामात १४,५१,१५७ साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले. कारखान्याने उच्चांकी ऊसदराची परंपरा जपत, २०२४- २५ सालच्या हंगामात गळितास आलेल्या उसाला ३३११ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला. कारखान्याचा हा दर जिल्ह्यात सर्वाधिक ठरला असून, विनाकपात १११ रुपयांचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर लवकरच वर्ग केला जाणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी ही माहिती दिली. याबाबत कारखान्याने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याने उच्चांकी ऊस दराची परंपरा जोपासत, गेल्या गळीत हंगामासाठी ३३११ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. आम्ही ऊस उत्पादकांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. गेल्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना यापूर्वी ३,२०० रुपयांप्रमाणे बिले जेण्यात आली आहेत. आता विनाकपात १११ रुपयांचा अंतिम हप्ता दिला जाईल.