सातारा : गोपूज कारखान्याकडून १०० टक्के ऊस बिले अदा

सातारा : गोपूज ग्रीन पॉवर शुगर लिमिटेडने एफआरपीप्रमाणे २८०० रुपये दराने ऊस बिलाची रक्कम संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चाचा इशारा दिल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने थकीत देयके अदा केली. आंदोलनात संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे, विजय देवकर, शंकर देवकर, मधुकर देवकर, शंकर देशमुख, विखळे, बनपुरी, उंबर्डे, पेडगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीला या साखर कारखान्याकडून ३३०० रुपये दर घोषित करण्यात आला. मात्र, ऊस बिले देण्यात आली नव्हती. यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. मार्च महिन्याच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आला होता. बँकांच्या कर्जाचे हप्ते, पीक कर्जाचे नूतनीकरण, खत व बियाणांचे थकीत देणे, वीज बिल भरणे, मजुरांचे पैसे, घरगुती खर्च यासाठी पैशांची अत्यंत निकड असताना, ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक झुंझार आसबे, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश यादव व इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी ऊस बिलांची पूर्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here