सातारा : एआय तंत्रज्ञानासाठी शासनाने अनुदान देण्याची आ. सचिन पाटील यांची विधानसभेत मागणी

सातारा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर त्यांना हवामानाचा अचूक अंदाज, पिकावरील रोगांचे निदान आणि औषध फवारणीचे योग्य मार्गदर्शन तंत्रज्ञानाद्वारे मिळणे आवश्यक आहे. बारामती मतदारसंघांमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपासून एआय तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर सुरू आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील असे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण तयार केले आहे. या तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना सरकारने विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत केली. पारंपरिक शेतीला मागे सोडून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी हे धोरण महत्त्वपूर्ण ठरले आहे असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले की, कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलमधून यंत्रसामुग्रीसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानासारखीच योजना एआय तंत्रज्ञानासाठीही लागू करावी. यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान सुलभ आणि परवडणारे होईल आणि त्याचा फायदा उत्पादन वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात होईल. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन लक्षणीय वाढले आहे. उदाहरणार्थ, पूर्वी ४० टन उस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने १०० ते १५० टन उत्पादन मिळत आहे. सामान्य शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान परवडणारे नसल्याने सरकारने योग्य ती मदत देणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here