सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम मध्यावर आला आहे. आठ खासगी व नऊ सहकारी अशा एकूण १७ साखर कारखाने गतीने ऊस गाळप करीत आहेत. आतापर्यंत या सर्व साखर कारखान्यांनी मिळून ७१ लाख ६० हजार ९८९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ६६ लाख एक हजार १७० क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.२२ टक्के असला तरी सहकारी कारखान्यांनी उताऱ्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर शुगर कारखान्याने सर्वाधिक १२ लाख सात हजार ९८० मेट्रिक टन ऊस गाळप करत आघाडी घेतली आहे. यावर्षी तोडणी वाहतूक विस्कळित असूनही हार्वेस्टरचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ऊस वेळेत जात असल्याचे चित्र आहे. मात्र, तुरा आल्यामुळे वजनात घट झालेली आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ६६ लाख साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. यावर्षी ऊस गाळपामध्ये खासगी साखर कारखाने पुढे आहेत. मात्र साखर उताऱ्यात हे कारखाने मागे पडल्याचे चित्र आहे. खासगी कारखाऱ्यांनी आतापर्यंत ४१,०२,९७० मेट्रिक टन उसाचे गाळप करता ३२,६२,५८० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ३०,५१,८१९ मेट्रिक टन ऊस गाळप करून ३३,८५,५९० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यांना १०.९२ टक्के साखर उतारा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्याला ११.८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या कृष्णा कारखान्याला ११.५५ टक्के, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या जवाहर श्रीराम कारखान्याला ११.५३ टक्के, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या रयत अथणी शुगरला ११.५४ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
















