सातारा : खोटे वजन दाखवून जरंडेश्वर कारखान्याची एक लाखाची फसवणूक, कोरेगाव तालुक्यातील तिघांवर गुन्हा

सातारा : चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये उसाचे खोटे वजन दाखवून एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील तिघाजणांवर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारखान्याचा वजन काटा कारकून, त्याचा साथीदार व ट्रॅक्टरमालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित दर्शन प्रताप शेडगे ( रा. चिमणगाव), रोहन विजय पवार (रा. वाघजाईवाडी) आणि सतीश नारायण चव्हाण (रा. एकंबे ) अशी त्यांची नावे आहेत. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत रात्रपाळीदरम्यान शेडगे याने आपल्या साथीदारांशी संगनमत करून, उसाचे खोटे वजन दाखवले आणि कारखान्याची फसवणूक केली.

पोलिसांनी सांगितले की, जरंडेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून ५० टनी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर दर्शन प्रताप शेडगे हा कारकून काम करत होता. त्याने वजनकाट्यावर ट्रॉलीचे वजन घेऊन टोकन पंच केल्यानंतर, ट्रॅक्टरचालक निघताच, शेडगे हा त्याचा मित्र रोहन विजय पवार याच्या ट्रॅक्टरचा नंबर कम्प्युटरमध्ये टाकत होता. कारखान्यात न आलेल्या पवार याच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला आधीच्या जड ट्रॉलीचे वजन लावले जात होते. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या चौकशीत शेडगे आणि पवार यांनी या प्रकाराची तोंडी व लेखी कबुली दिली. तिघांनी संगनमत करून, पाच ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये प्रत्येकी सहा टन असे ३० टन खोटे वजन दाखवून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी कारखान्याचे कार्यालय अधीक्षक संदीप सावंत यांनी तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here